News Description
योग्य जोडीदाराच्या निवडीसाठी विवाह मेळावे उपयुक्त – सौ. योगिताताई पिपरे
गडचिरोली : दि. ३ मे २०२६
येथील संताजी भवन येथे आयोजित सामूहिक वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याद्वारे युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी केले.
विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा पवित्र बंध असल्याने योग्य विचार, शिक्षण, संस्कार आणि परस्पर विश्वास यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या मतांचा आदर करून समंजसपणे निर्णय घ्यावा, तसेच युवक-युवतींनी अशा मेळाव्यांच्या माध्यमातून योग्य जोडीदाराची निवड करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भैय्याजी सोमनकर, प्रकाशजी डांगे, हेमंजी मुरकुटे, सौ. पौर्णिमाताई सातपुते तसेच संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सातपुते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी तसेच Wadhuwar OPC Private Limited यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमात विविध समाजातील वधू-वरांचा सामूहिक परिचय करून देण्यात आला.
तेली, कुनबी, कोष्ठी, कलार व धोबी या पाच समाजातील वधू-वरांसोबतच पुनर्विवाह इच्छुकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मेळाव्याचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उष्टुजी चालक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीजाबाई सातपुते, यशवंत भांडेकर, द्रोणाक्ष सतपुते, विवेक सतपुते, अमोल कुकडकर, एम. डी. चलाख, संदीप बोदलकर, गोपीचंद बोदलकर यांनी सहकार्य केले.
या मेळाव्यासाठी सुमारे ५०० वधू-वरांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी १०० जण प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.